डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील कॅन्सरतज्ञ डॉ. अतुल भारंबे यांच्या प्रयत्नांना यश
जळगाव : सुपारीच्या व्यसनामुळे तोंडात झालेल्या गाठीचे निदान झाल्यानंतर निंभोरा येथील ५० वर्षीय महिला रूग्णावर कॅन्सर तज्ञ डॉ. अतुल भारंबे यांनी जोखमीची कमांडो शस्त्रक्रिया यशस्वी केली.
याबाबत माहिती अशी की, निंभोरा येथील एका ५० वर्षीय महिलेला सुपारी खाण्याची सवय होती. या सवयीमुळे महिलेचा गाल दुखू लागला होता. या महिलेने स्थानिक रूग्णालयात दाखविले असता तात्पुरते उपचार करण्यात आले. मात्र महिलेच्या जबड्याचे दुखणे वाढल्याने अखेर त्यांनी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातील कॅन्सर तज्ञ डॉ. अतुल भारंबे यांच्याकडे दाखविले. डॉ. भारंबे यांनी बायप्सी तपासणी केली असता तोंडाचा कर्करोग असल्याचे निदान करण्यात आले. तसेच सीटी स्कॅनद्वारे कर्करोग कुठल्या टप्प्यात आहे यांची तपासणी करण्यात आली. सदर महिलेला पहिल्या टप्प्यातील तोंडाचा कर्करोग असल्याचे निदान झाल्यानंतर कॅन्सर तज्ञ डॉ. अतुल भारंबे यांनी तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर कमांडो शस्त्रक्रिया यशस्वी केली. महात्मा ज्योतिराव फुले योजनेत ही शस्त्रक्रिया संपूर्ण मोफत करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी डॉ. सेजोल कश्यप, डॉ. स्मृती भोजने आणि भूलशास्त्र तज्ञांचे सहकार्य लाभले.
कॅन्सर ह्या आजाराचे वेळीच निदान होणे आवश्यक असते. आपल्या देशात कॅन्सर जेव्हा शेवटच्या टप्प्यात येतो तेव्हा रूग्ण उपचारासाठी धावपळ करतात. निंभोरा येथील महिलेने वेळीच रूग्णालयाशी संपर्क साधल्याने त्यांच्या तोंडाचा कर्करोग हा पहिल्याच टप्प्यात राहिल्याने ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. तसेच या महिलेला कुठल्याही केमो थेरेपी किंवा रेडीएशनची आता गरज नाही. त्यामुळे कॅन्सरला घाबरू नका पण जागरूक नक्की रहा.
– डॉ. अतुल भारंबे, कॅन्सर तज्ञ, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.