शिस्त अन् कठोर परिश्रमानेच घडतो यशस्वी डॉक्टर – डॉ. आर्विकर

0
71

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा व्हाइट कोट समारंभ उत्साहात

जळगाव : पारंपारिक आणि आधुनिक शिक्षण पध्दत यात नवनविन संकल्पना आल्यामुळे आशादायी व स्थिर फरक निर्माण झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रात पदार्पण करतांना अत्यंत खडतर मार्गाने प्रवास करावा लागतो. शिस्त, प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रमानेच यशस्वी डॉक्टर घडत असल्याचे प्रतिपादन डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे डिन डॉ. एन.एस. आर्विकर यांनी आज येथे केले. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अ‍ॅनाटॉमी विभागातर्फे एमबीबीएसच्या प्रथम वर्षात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा व्हाइट कोट समारंभ शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला, यावेळी ते बोलत होते.

राज्यात प्रथमच डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून अशा प्रकारचा समारंभ घेण्यात आला. समारंभाच्या सुरूवातीला डिन एन.एस.आर्विकर यांच्या हस्ते आरोग्य देवता धन्वंतरीचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी हृदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, प्रा. डॉ. शिवानंद राठोड, डॉ.अनुश्री अग्रवाल, मेडिसीन विभागाचे डॉ.सी.डी.सारंग, मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ.कैलास वाघ, अ‍ॅनाटॉमी विभागाच्या प्रा. डॉ. शुभांगी घुले वाघ, शल्यचिकीत्सा विभागाचे प्रमुख डॉ. शिवाजी सादुलवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

डिन डॉ. एन.एस. आर्विकर यांनी पुढे बोलतांना सांगितले की, जेव्हा तुम्ही समाजात डॉक्टर म्हणून कार्य करू लागतात तेव्हा तुमची जबाबदारी वाढते. तसेच तुम्ही ज्या संस्थेतून शिक्षण घेतले त्या संस्थेचे तुम्ही प्रतिनीधीत्व करीत असतात. त्यामुळे शिस्त आणि कठोर परिश्रम हे यशस्वी डॉक्टर होण्याचा कानमंत्र आहे. वैद्यकीय शैक्षणिक वर्षात अभ्यासासह अंतर्गत मुल्यांकन तुम्हाला गांभीर्याने घ्यावे लागणार आहे. आज तुम्हाला दिलेला हा व्हाइट कोट हा तुम्हाला तुमच्या जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. या संस्थेत तुम्हाला खुप उज्ज्वल भविष्य असल्याचेही डॉ.आर्विकर यांनी सांगितले.

हा समारंभ फाऊंडेशन कोर्सच्या मार्गदर्शक तत्वानुसार फाऊंडेशन कोर्सच्या समन्वयिका डॉ.शुभांगी घुले व त्यांच्या सहकार्‍यांनी यशस्वी केला. देवानंतर डॉक्टरांनाच मानाचे स्थान – डॉ.प्रेमचंद पंडीत प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा त्यांच्या आयुष्यातील खुप मोठा दिवस आहे. विद्यार्थ्यांनी घातलेला हा व्हाइट कोट दिसायला सुंदर आहे, पण त्याची जबाबदारी तितकीच कठीण आहे. खुप घाव सहन केल्यावर जशी सुबक मुर्ती घडते तसेच हे वैद्यकीय शिक्षण आहे. खुप घाव सहन करावे लागतात, परिश्रम करावे लागतात आणि मगच आपण यशाचा पल्ला गाठु शकतो. देवानंतर डॉक्टरांनाच समाजात मानाचे स्थान असल्याचे मत वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी व्यक्त केले.

व्हाइट कोट म्हणजे सामाजिक विश्‍वासाचे नाते : प्रमोद भिरूड

व्हाइट कोट हा काही केवळ एक कपडा नाहीये. ते समाजाचे तुमच्या सोबत असलेले एक विश्‍वासाचे नाते असल्याचे मत वैद्यकीय महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रमोद भिरूड यांनी व्यक्त केले. वैद्यकीय शिक्षण हे आर्ट आणि सायन्स दोघेही आहेत. रूग्णाबद्दलची आस्था ही आर्ट आहे तर सायन्स म्हणजे मानवी अवयवांचे शास्त्र आहे. ह्या दोघांची सांगड घालून वर्तमानाचा सदुपयोग करा असा सल्लाही श्री. भिरूड यांनी दिला. विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना व्हाइट कोट घालून गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्यावतीने वैशाली वानखेडे आणि आशिष रथ यांनी मनोगत व्यक्त केले. तर समारंभाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रिया बालानी आणि बुशरा खान यांनी केले. याप्रसंगी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टर्स उपस्थीत होते.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here