महिला सबलीकरण ही काळाची गरज

0
21

जळगाव । समाजपरत्वे, देशपरत्वे स्त्रियांचे स्थान आणि भूमिका बदललेल्या दिसून येतात. या गोष्टीला त्या त्या समाज व देशांच्या रूढी, परंपरा, मूल्ये, मानदंड जबाबदार असतात. महिला सबलीकरण, म्हणजे मानवी व्यवहारांच्या सर्वच पातळींवर स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने संधी उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. महिला सबलीकरण ही काळाची गरज असल्याचा सूर गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात मान्यवरांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक बहि:शाल शिक्षण मंडळाच्या निर्देशानुसार गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात स्टुडंट वेल्फेअर विभागातर्फे महिला सबलीकरण या विषयावर दोन दिवसीय व्याख्यानमाला व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्यान आणि चर्चासत्राला नाहाट महाविद्यालयातील डिपार्टमेंट ऑफ पॉलिटीकल सायन्स विभागप्रमुख प्रा.डॉ. राजेंद्र नाडेकर, डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशनचे विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रमोद अहिरे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. यावेळी स्टुडंट वेल्फेअर विभागातर्फे प्रा. मनोरमा कश्यप, प्रा. स्वाती गाडेगोने, प्रा. जॉय जाधव, प्रा. श्रृती सपाटे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रा. डॉ. अहिरे यांनी संविधानात महिलांना दिलेल्या अधिकाराविषयीची माहिती दिली.

भारतीय संविधानाने दिलेले मुलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे हा स्त्रियांच्या विकासाचा पाया आहे. आपल्या शासनाने १९९४ मध्ये पहिले महिला धोरण जाहीर केले. तसेच या धोरणाची योग्य ती अंमलबजावणी करण्यासाठी ७ मे २०१३ रोजी महिला व बालविकास अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. त्यानुसार महिला धोरण जाहीर करण्यात आले व महिला सबलीकरणाला खर्‍या अर्थाने सुरुवात झाल्याचे त्यांनी सांगितले. तर प्रा. डॉ. नाडेकर यांनी वेगाने बदलणार्‍या आजच्या आधुनिक युगात महिला सबलीकरण किंवा महिला सशक्तिकरण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. महिला सबलीकरण म्हणजे ती स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते आणि कोणाच्याही साहाय्याशिवाय जीवन जगू शकते. महिला सबलीकरण ही काळाची गरज आहे.

महिला सबलीकरणासाठी विविध कार्यक्रम व ध्येयधोरणे राबविले जात आहेत त्यातून महिला विकासाचा तसेच महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, वैचारिक, कौटुंबिक, व्यावसायिक अशा विविध घटकांचा विचार केला जात असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य विशाखा गनवीर, सहा. प्रा. प्रवीण कोल्हे, प्राध्यापक वर्ग आणि २५ विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here