जळगाव – जन्मत:च नवजात शिशुच्या छातीत आतडे शिरल्याने त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. मात्र डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातील तज्ज्ञ बालरोग शल्यचिकीत्सक डॉ. मिलींद जोशी यांनी थोरॅकोस्कोपीक सीडीएच रिडक्शन अँड रिपेअर ही दुर्मिळ शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे करून शिशुचे प्राण वाचवले.
याबाबत माहिती अशी की, अमोल सुतार यांच्या पत्नीची प्रसूती सामान्य रूग्णालयात झाल्यानंतर जन्मलेल्या नवजात शिशुच्या छातीत आतडे शिरल्याने त्याला श्वासोच्छवास घेता येत नव्हता. अशा परिस्थितीत या नवजात शिशुला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ज्ञ बालरोग शल्यचिकीत्सक डॉ. मिलींद जोशी यांनी नवजात शिशुच्या छातीचा एक्स-रे केला. या एक्स-रेमध्ये कन्जनायटल डायफ्रॉमॅटीक हर्निया असल्याचे निदान करण्यात आले. या आजारामुळे नवजात शिशुला श्वास घ्यायला त्रास होत होता. तसेच त्याच्या फुफ्फुसांची देखिल वाढ होत नव्हती. निदानानंतर नवजात शिशुवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुतार यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना रूग्णालयात उपलब्ध असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला. त्यानंतर नवजात शिशुवर दुर्बिणीद्वारे थोरॅस्कोपीक सीडीएच रिडक्शन अँड रिपेअर ही दुर्मिळ शस्त्रक्रिया करण्यात आली. योजनेंतर्गत ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी डॉ. वैभव फरके, डॉ. ऋषीकेश कुळकर्णी, डॉ. आकांक्षा राजपूत, डॉ. चैतन्य भोळे, भूलशास्त्र तज्ज्ञ डॉ. सतीश पतीपती, डॉ. शितल फेगडे, डॉ. शिवाजी सोनोने यांचे सहकार्य लाभले.
दुर्मिळ अन् जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी
तज्ज्ञ बालरोग शल्यचिकीत्सक डॉ. मिलींद जोशी आणि त्यांच्या टीमने केलेली ही शस्त्रक्रिया अत्यंत दुर्मिळ आहे. 30 ते 35 हजार नवजात शिशुंमधून अवघ्या तीन ते चार शिशुंना अशा प्रकारचा आजार होतो. तसेच यावरील शस्त्रक्रिया ही एकमेव डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात योजनेंतर्गत मोफत केली जाते.
कोट….
नवजात शिशुच्या छातीत आतडे शिरल्याने त्याला श्वास घ्यायला त्रास होतो. तसेच ही परिस्थिती अधिक काळ राहिल्यास शिशुला कृत्रीम श्वासोच्छवास देण्याची वेळ येते. वेळीच या आजाराचे निदान आणि शस्त्रक्रिया न केल्यास शिशु दगावण्याची जोखीम असते. त्यामुळे शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते. डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात ही सुविधा उपलब्ध आहे.
– डॉ. वैभव फरके