डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील शल्यचिकीत्सकांचे यश
जळगाव – भुसावळ तालुक्यातील एका 40 वर्षीय महिलेच्या पित्ताशयातून तब्बल 50 ते 60 खडे दुर्बिणीद्वारे काढण्यात शल्यचिकीत्सकांना यश आले आहे. या शस्त्रक्रियेमुळे महिलेची प्रकृती आता पुर्वीप्रमाणे ठणठणीत झाली आहे.
याबाबत माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून सयान बी फारूक (वय 40) या महिलेच्या पोटात सातत्याने दुखत होते. हा त्रास असह्य झाल्याने त्यांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. याठिकाणी शल्यचिकीत्सा विभागाचे प्रमुख डॉ. शिवाजी सादुलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शल्यचिकीत्सक डॉ. चैतन्य पाटील यांनी महिलेची तपासणी केली. तपासणी अंती पित्ताशयात खडे असल्याचे निदान करण्यात आले. त्यानंतर रूग्णावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. महिलेच्या पित्ताशयातील खडे काढण्यासाठी लॅप्रोस्कोपीक कोलेसिस्टोटोमी ही शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे करण्यात येऊन महिलेच्या पित्ताशयातून खडे काढण्यात आले. तसेच रूग्णाला यापुर्वी हर्निया देखिल झालेला असल्याने लॅप्रोस्कोपीक कोलेसिस्टोटोमी विथ इनसिझन हर्निया ही शस्त्रक्रिया देखिल करण्यात आली. या शस्त्रक्रियेमुळे महिला रूग्णाचा पोटदुखीचा त्रास दूर झाला. या शस्त्रक्रियेसाठी डॉ. चैतन्य पाटील यांना डॉ. किरण, डॉ. वैभव फरके, डॉ. बी.आर. सोनवणे यांचे सहकार्य लाभले.