भुसावळ एचडीएफसी बँकेत रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव : मानवाने कितीही प्रगती केली तरी कृत्रिम रक्त तयार करण्यात अद्याप यश मिळाले नाही. दररोज रूग्णांसाठी रक्ताची होत असलेली मागणी व त्यामानाने होणार पुरवठा यात मोठी तफावत आहे. रक्तदान शिबीरांच्या माध्यमातून ही तूट भरून काढण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. जगात रक्तदान हाच खरा माणूसकीचा धर्म असल्याचे मत गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील यांनी आज येथे व्यक्त केले.
डॉ उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालय रक्तपेढी आणि एचडीएफसी बँक भुसावळ शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील आणि प्रख्यात हृदयविकार तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी शाखा व्यवस्थापक नरेंद्र परदेशी, सहाय्यक व्यवस्थापक विजय सोनवणे, निखीलेश तिवारी, अजित बाविस्कर, नितेश चावडा, मानसिंग बाबुजी, श्री. कोलते, श्रीे. भारंबे, सोनाली शर्मा, नेहा दर्डा, सुवर्णा पाटील यांच्यासह बँकेतील स्टाफ उपस्थित होते.
गत १३ वर्षापासून डिसेंबर महिन्यात एचडीएफसी बँकेतर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन केले जात असल्याबद्दल डॉ. केतकी पाटील यांनी कौतुक केले. तसेच बँकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचा शब्दसुमनांनी गौरवही केला. रक्तदान शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. शिबीरासाठी गोदावरी फाऊंडेशनचे वरिष्ठ लेखापाल योगेश पाटील, डॉ उल्हास पाटील रक्तपेढी प्रमुख डॉ नितीन भारंबे, लक्ष्मण पाटील यांनी सहकार्य केले.