जळगाव : जळगाव-भुसावळ राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी एका चारचाकी वाहनाच्या अपघातात जखमी झालेल्यांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचारी राधेशाम राणे, आकाश पाटील व सहकार्यांनी प्रसंगावधान राखून तातडीने डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात हलविल्याने त्यांचे प्राण वाचले. याबाबत माहिती अशी की, जळगाव-भुसावळ राष्ट्रीय महामार्ग क्रं. ६ वर माऊली पेट्रोलपंपाजवळ एर्टीगा या चारचाकी वाहनाचे टायर फुटून अपघात झाला. या अपघातात सिंधू बोरोले, शोभा अहिरे, सुनीता कळसकर, लता बाळापुरे, रेखा खोड, युवराज कासार, शकुंतला राखुंडे आणि निर्मला कळसकर हे आठ जण जखमी झाले.
याचवेळी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे कर्मचारी राधेशाम राणे व आकाश पाटील आणि त्यांचे सहकारी जात होते. अपघातस्थळी दाखल होताच तातडीने त्यांच्याच वाहनात आणून त्यांना उपचारासाठी भरती करण्यात आले. याठिकाणी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांनी आपात्कालीन विभागात जाऊन अपघातग्रस्त रूग्णांची पाहणी करून डॉक्टर आणि स्टाफला आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी वरीष्ठ लेखापाल योगेश पाटील, सुनील बोंडे, विकास बेंडाळे यांनीही सहकार्य केले. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचार्यांच्या प्रसंगावधानामुळे अपघातग्रस्तांचे प्राण वाचले.