रावेर । सर्वांगिण विकास आणि यश प्राप्तीसाठी विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरावी असे आवाहन गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील यांनी केले. रावेर तालुक्यातील विवरे येथील ग. गो. बेंडाळे विद्यालयात आयोजित ५१ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी ग.गो. बेंडाळे संस्थेचे चेअरमन धनाजी लढे, मार्तंड भिरुड, शैलेश राणे, धनंजय चौधरी, जे.के. पाटील, प्रकाश मुजुमदार, श्री. दलाल, राजेंद्र फेगडे, श्री. दखणे, विलास कोळी, रत्ना लोहार, रागिणी लांडगे, गणेश धांडे, प्रभाकर बोडे, शिक्षक रईस, दीपक सोनार, प्रफुल्ल मानकर, शालिनी मेश्राम, दीपक मराठे, राहुल मेढे, नरेंद्र पाटील, विजय मायनाडे आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन कार्यक्रमास सुरुवात झाली.
फीत कापून मान्यवरांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. केतकी पाटील पुढे म्हणाल्या की, प्रत्येक क्षेत्रात विज्ञान पोहचले आहे. विज्ञानाच्या साहाय्याने प्रगती करावी. विद्यार्थ्यांनी स्वतःच विषय निवडून युट्युबवर सर्च करून प्रोजेक्ट बनवावा व आपल्या शिक्षकांना दाखवावा. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाही अभ्यास करावा. टीव्हीचा उपयोग प्रोजेक्टसाठी करावा असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी डॉ. केतकी पाटील यांनी विज्ञान प्रदर्शनीची पाहणी करून विद्यार्थ्यांमधील संशोधकवृत्तीचे कौतुकही केले.