जळगाव । येथील डॉ. उल्हास पाटील महाविद्यालयात रस्ता सुरक्षा अभियानार्तंगत वाहतुक नियमाचे धडे विदयार्थ्यांनी गिरवले. भारतात दरवर्षी असंख्य अपघात होतात. त्यामध्ये हजारो प्रवासी मृत्युमुखी पडतात. या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय रस्ता सुरक्षितता अभियान हे प्रत्येक वर्षी देशभर राबविण्यात येते.
त्या अनुषंगाने डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयामध्ये रस्ता सुरक्षा अभियान यावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख वक्ता सुनिल बाबुराव गुरव (आरटीओ जळगाव), गणेश पाटील (असिस्टंट आरटीओ इन्स्पेक्टर) हे उपस्थित होते. त्यांच्यासोबत महाविद्यालयाचे वैद्यकिय संचालक डॉ. एन एस आर्विकर, प्रशांत गुडडेटीवार व सर्व विभाग प्रमुख तसेच प्राध्यापक वर्ग विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. रस्ता सुरक्षा या अभियाना अंतर्गत मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त कशी बाळगावी याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच आपल्या वाहनाचे आरसे याचे महत्त्व सांगताना सिग्नल चे पालन आणि हेल्मेट चा वापर खूप महत्त्वाचा आहे हे नमूद केले. त्याचप्रमाणे केवळ वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी करणे हा या मोहिमेचा उद्देश्य न ठेवता समाज प्रबोधनातून रस्ता सुरक्षेचे महत्त्व लोकांना पटवून द्यावे या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. त्याचप्रमाणे त्यांनी रस्ता सुरक्षा संबंधित विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले.