डेंग्यू आणि प्लेटलेट्स बद्दल ही माहिती वाचवू शकते तुमचे प्राण

0
275

प्रसंग 1
एक तरुण मुलगा नुकताच माझ्याकडे डेंग्यूने एडमिट होता. खूप ताप होता. प्लेटलेट्स कमी झाल्या होत्या. त्याच्या हृदयाचे ठोके, रक्तदाब व तापाचे प्रमाण आणि इतर लक्षणांप्रमाणे उपचार चालू होते. त्यावेळी मला आमच्या वॉर्ड मधील सिस्टर यांचा फोन आला. नातेवाईक इथे खूप बडबड करत आहेत. आमचा रुग्ण गंभीर असून पण त्याला कुठलेही हायर अँटीबायोटिक दिलेले नाही. मी त्या रुग्णाच्या नातेवाईकांना बोलावून समजावून सांगितले की त्याला अँटिबायोटिकची काहीही गरज नाही

प्रसंग 2
डेंग्यूचा रुग्ण
पहिल्या दिवशी प्लेटलेट्स 1,70,000.
दुसऱ्या दिवशी 1,40,000.
तिसऱ्या दिवशी 90,000
चौथ्या दिवशी 55,000
रुग्णाच्या नातेवाईकांचा प्रश्न होता..ऍडमिट केल्यानंतर सुद्धा प्लेटलेट इतक्या कमी होत आहेत, मग डॉक्टर तुम्ही काय करतात? काही उपचार का करत नाही?

प्रसंग 3
प्लेटलेट्स 2,15,000वरून55,000 ने एकदम कमी होऊन1,60,000 इतक्या झाल्या आहेत. त्यामुळे पेंशटला खूप टेन्शन आले आहे.

प्रसंग 4
ऍडमिट केल्यानंतर चौथ्या दिवशी पेशंटची तब्येत अचानक खालावली. बीपी कमी झाले. छातीत पाणी झाले. त्याला ताबडतोब आयसियुत हलवावे लागले. ऍडमिट करून पण त्याची तब्येत खालावली म्हणजे डॉक्टरांचे दुर्लक्ष झाले आहे

प्रसंग 5
प्लेटलेट्स50,000 वरून18,000 इतक्या झाल्या. जर डॉक्टरांनी आधीच प्लेटलेट दिल्या असत्या तर ही वेळ आली नसती. डॉक्टरांनी उशीर केला आहे.

 आता आपण डेंग्यू या आजाराबद्दल शास्त्रीय माहिती जाणून घेऊ आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे बघूयात...

डेंग्यू हा आजार 'डेंग्यू व्हायरस'या फ्लावी व्हायरस गटातील विषाणूमुळे होतो. हा विषाणू एडीस इजिप्ती या डासाच्या चाव्यामुळे मनुष्याच्या शरीरात प्रवेश करतो.
डेंग्यू व्हायरसचे चार सीरो टाइप्स आहेत.
DEN 1,DEN 2,DEN 3,DEN 4.
जर यातल्या एकामुळे डेंग्यू झाला तर ज्या संरक्षक अँटीबोडीज तयार होतात, आयुष्यभर त्या रुग्णाचे त्या सिरोटाईप पासून संरक्षण करतात.  परंतु दुसऱ्या सिरो टाईपमुळे त्याला डेंग्यू परत होऊ शकतो. त्यामुळे एका रुग्णाला आयुष्यात चार वेळा डेंग्यू होऊ शकतो.
डेंग्यूचा डास चावल्यानंतर साधारण पाच ते सात दिवसांनी लक्षणे दिसू लागतात.

लक्षणे
तीन अवस्था असतात.
पहिली अवस्था ..तापाची
दुसरी अवस्था.. गंभीर गुंतागुंत होण्याची
तिसरी अवस्था ..हळूहळू सुधारणा होण्याची

पहिल्या अवस्थेतील लक्षणे
ताप, अंगदुखी, डोकेदुखी, हाडे दुखणे, सांधे दुखणे, स्नायू दुखणे, डोळ्यांच्या मागे दुखणे, शरीरावर पुरळ येणे, थकवा, अशक्तपणा, बारीक बारीक रक्तस्त्राव होणे.. उदाहरणार्थ नाकातून रक्तस्त्राव.

दुसऱ्या अवस्थेतील लक्षणे
नंतर रुग्ण दुसऱ्या अवस्थेत जातो यावेळी गंभीर लक्षणे उत्पन्न होऊ शकतात .रक्तदाब कमी होणे, फुफुसात किंवा पोटात पाणी जमा होणे. याचवेळी भान हरपणे, यकृताला सूज येणे इ. लक्षणे दिसू लागतात. रुग्णाची परिस्थिती गंभीर होते. यावेळी रुग्णाचा मृत्यू होण्याची पण शक्यता असते सलाईन आणि इतर सपोर्टिव्ह (फक्त आधार)उपचारांचा योग्य वापर यावेळी अतिशय कुशलतेने करावा लागतो. ही धोक्याची अवस्था ओलांडल्या नंतर हळूहळू रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होते.
थकवा आणि अशक्तपणा मात्र बरेच दिवस राहू शकतो.

निदान
डेंग्यू ची लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये रक्ताच्या तपासण्या करतात यात RTPCR किंवा NS 1 ANTIGEN चाचणी positive आली तर डेंग्यू चे निदान करता येते
नुकताच डेंग्यू होऊन गेलेल्या रुग्णांमध्ये IgM ही चाचणी positive दिसते आणि ती antibody चाचणी असल्याने ती दोन ते तीन महिने positive दिसू शकते. डेंग्यू सोडून इतर फ्लावी व्हायरस विषाणूंमध्ये सुद्धा या चाचण्या positive दिसू शकतात आणि डेंग्यूचे निदान चुकू शकते.
RTPCR ही जरी जास्त अचूक चाचणी असली तरी ती महागडी आहे आणि लवकर उपलब्ध होत नाही. याशिवाय डेंग्यू च्या रुग्णांमध्ये इतर काही COMPLICATIONS झाले आहेत किंवा नाही हे बघण्यासाठी इतर तपासण्या लागतात.

उपचार
डेंग्यू वर अजून पर्यंत कुठलेही उपचार उपलब्ध नाहीत. फक्त supportive treatment (आधारात्मक उपचार) करावे लागतात. म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी योग्य ठेवणे रक्तदाबावर लक्ष ठेवणे. फुप्फुस, यकृत, किडनी यांना सूज आल्यास त्यावरील उपचार करणे.
मलेरिया किंवा हार्ट अटॅक वर पण औषधे उपलब्ध आहेत .परंतु डेंग्यू वर नाही
प्लेटलेटच्या पेशी कमी होऊ नये किंवा पेशंट पहिल्या तापाच्या अवस्थेतून दुसऱ्या गंभीर गुंतागुंतीच्या अवस्थेत जाऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक कुठलीही औषधे नाहीत. शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखणे खूप महत्त्वाचे आहे .या आजारात रक्तवाहिन्यांमधून द्रव पदार्थ लिक होतो आणि रक्तवाहिन्यातील पाणी कमी होते पाण्याची पातळी कमी झाल्यास रक्तदाब कमी होऊ शकतो. फुफुसात किंवा पोटात जर पाणी जमत असेल आणि त्यात पाण्याची पातळी वाढल्यास अडचणींमध्ये भर पडू शकते. आणि हे संतुलन अतिशय अवघड असते.

प्लेटलेटच्या आकड्यांचा खेळ आणि वास्तव
प्लेटलेट या शरीरात रक्तस्त्राव थांबवण्याचे काम करतात सर्वसामान्यपणे प्लेटलेटची संख्या शरीरात दीड लाख प्रति मिलीलीटर पेक्षा जास्त असते. डेंग्यूच्या आजारात प्लेटलेट ची संख्या कमी होते.
जर रुग्णाला रक्तस्त्राव होऊ लागला आणि प्लेटलेट ची संख्या कमी असेल तर त्याला प्लेटलेट्स द्याव्या लागतात.
अन्यथा प्लेटलेट ची संख्या 10,000 किंवा काहीवेळा 5,000 पेक्षा कमी झाली तरच प्लेटलेट्स द्याव्यात असे शास्त्रीय मार्गदर्शक तत्वे आहेत. त्यामुळे प्लेटलेट्सची संख्या कितीने कमी झाली वगैरे आकडे बघणे निरर्थक आहे.
या दिलेल्या प्लेटलेट्स फक्त काही वेळ म्हणजे काही तास शरीरात टिकतात आणि नंतर प्लेटलेट पुन्हा कमी होतात. पुन्हा प्लेटलेट्स द्यावे लागतात.
डेंग्यू च्या आजारात प्लेटलेट्स कमी होऊ नये यासाठी कुठलेही प्रतिबंधात्मक औषध उपलब्ध नाही.
प्लेटलेट्स देणे हा डेंग्यू वरील उपचार नाही. त्याने रुग्ण बरा होत नाही किंवा आजाराचा कालावधी कमी होत नाही. किंबहुना काही वेळा या प्लेटलेट्स घातकही ठरू शकतात. परंतु अज्ञानापोटी बऱ्याच रुग्णांचे नातेवाईक प्लेटलेट्स लावण्याचा आग्रह धरतात जे काही वेळा धोकादायक ठरू शकते.
जर रुग्णाला रक्तस्राव होत नसेल आणि त्याच्या प्लेटलेटची संख्या 10,000पेक्षा जास्त असेल तर त्याला प्लेटलेट्स लावणे हे फायद्यापेक्षा तोट्याचे जास्त ठरू शकते. शिवाय आर्थिक भुर्दंड वेगळाच!
प्लेटलेटशी संख्या वाढवण्यासाठी काही औषधी उपलब्ध असतात उदाहरणार्थ inj Romiplastin. परंतु डेंग्यू च्या आजारात ही औषधे उपयोगी ठरत नाहीत. अगदी शेवटचा उपाय म्हणून स्टेरॉईडची इंजेक्शन दिली जाऊ शकतात. परंतु अजूनही त्यांची उपयुक्तता सिद्ध झालेली नाही.
प्लेटलेट्स हा घटक अत्यंत जीवनावश्यक आहे आणि योग्य परिस्थिती असेल तर तो देणेही आवश्यक आहे.
थोडक्यात खूप अत्यावश्यक असेल तरच प्लेटलेट्स द्याव्यात अन्यथा त्यात फायद्यापेक्षा नुकसान होण्याची शक्यता जास्त असते.

प्लेटलेट ट्रान्सफ्युजनचे संभाव्य धोके..
1)Febrile non hemolytic transfusion reaction… यामुळे ताप ,उलट्या, मळमळ ,जीव घाबरणे ,रक्तदाब कमी होणे होऊ शकते.

2)Allergic and anaphylaxis… गंभीर स्वरूपाची रिएक्शन येऊ शकते

3)TRALI Transfusion related acute lung injury…फुफ्फुसाला गंभीर स्वरूपाची इजा होते.

4)Transfusion associated Graft vs host disease…प्लेटलेट्स दिल्यानंतर एक ते सहा आठवड्यांनी ही गुंतागुंत होऊ शकते

5)Post transfusion purpura

6)Transfusion related immunomodulation

7)platelet refractoriness… प्लेटलेट्स दिल्यानंतर प्लेटलेटची संख्या अपेक्षित वाढत नाही किंबहुना ती आणखी कमी होते

8)Circulatory overload…हृदयावर आणि फुफ्फुसावर ताण पडतो

9)संसर्ग जन्य आजार काही जिवाणू आणि विषाणू त्याद्वारे रुग्णाच्या शरीरात जाऊ शकतात

10)रक्तदाब खूप कमी होणे.. विशेषता जे रुग्ण ACE INHIBITORS या उच्च रक्तदाबावरच्या गोळ्या घेत असतात त्यांच्यामध्ये.
प्लेटलेट्स हा डेंग्यू आजारावरील प्रत्यक्ष उपचार नाही तो एक तात्पुरता आधार आहे तोही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे धोकादायक ठरू शकते

 डेंग्यू या आजारावर प्रत्यक्ष उपचार नसल्यामुळे त्याला प्रतिबंध करणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे. डासांपासून आपला बचाव करणे हेच सर्वात इष्ट होय.

निष्कर्ष..

1) डेंग्यू वर कुठलेही प्रत्यक्ष औषध उपलब्ध नाही. फक्त supportive treatment

2) प्लेटलेट कमी न होऊ देणे, प्लेटलेट्स वाढवणे किंवा गुंतागुंत होऊ न देणे यासाठी कुठलेही औषध उपलब्ध नाही.

3)प्लेटलेट्स देण्याचा निर्णय खूप विचारपूर्वक घ्यावा लागतो.

4) प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपचार.


हर्षल विजय सयाजी
(डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल मधील अतिदक्षता विभागाचे प्रमुख)

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here