शेतकऱ्यांशी संवाद साधून जाणून घेतली नुकसानीची माहिती
जळगाव । गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यासह राज्यभरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मवार दि.४ डिसेंबर रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संजय राठोड हे जिल्हादौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्यासमवेत माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष प्रदिप पवार ह्यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. याप्रसंगी शेतकऱ्यांशी संवाद देखील साधून नुकसानीबाबत मदत मिळवून देण्याचे आश्वासनही दिले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशनानुसार आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संजय राठोड हे जळगावात आले होते. याप्रसंगी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर दुष्काळग्रस्त भागांची माहिती घेत उपाध्यक्ष संजय राठोड हे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, जळगाव काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रदिप पवार यांच्यासह मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. यावेळी पिकांची पाहणी करुन अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबातचा आढावा घेतला. तसेच शेतकरी बांधवांशी संवादही साधला. याप्रसंगी बांधावरील शेतकऱ्यांशी झालेल्या चर्चेतून पंचनामे करण्यात वेळ भरपूर जाईल, त्याऐवजी सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून पुढे आली.
या पाहणीप्रसंगी प्रदेश सचिव आशुतोष पवार, आत्माराम जाधव, सुभाष पवार, जामनेर तालुकाध्यक्ष शंकर राजपूत, बोदवड तालुकाध्यक्ष भारत पाटील, शहराध्यक्ष ज्योती धामोळे, अॅड. अरविंद गोसावी, डॉ. जगदिश पाटील, संजय पाटील, संजय धामोळे, गुलाबराव पाटील, विठ्ठलराव चव्हाण, एकनाथ चव्हाण, साहेबराव चव्हाण, अशोक डिवरे, शांताराम पाटील, गोपाळ सुरोसे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.