जळगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधत गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाने शनिवार दिनांक ३० सप्टेंबर रोजी महाविद्यालय परिसरासह साकेगाव येथील शाळा, ग्रामपंचायत भवन येथे परिसराची स्वच्छता करुन आदर्श निर्माण केला. याप्रसंगी महाविद्यालय परिसरातील ‘किवा तेवन’ येथे स्वच्छतेची शपथही देण्यात आली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर दरम्यान देशभरात स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या आवाहनाला गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाने उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वच्छता अभियान राबविले. आज सकाळी सर्वप्रथम गोदावरी नर्सिंग महाविद्यालय परिसरातील पार्किंगचा परिसर स्वच्छ करण्यात आला. यात शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यानंतर परिसरातील तलावांची तसेच जवळच असलेल्या साकेगाव येथील इंदिरा गांधी प्राथमिक विद्यालयाचे मैदान व ग्रामपंचायत भवन परिसराची यावेळी स्वच्छता करण्यात आली.
नर्सिंग महाविद्यालयातील कम्युनिटी हेल्थ विभागातर्फे आयोजित कार्यक्रमातून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाचे उपप्राचार्या प्रा.विशाखा वाघ, प्रा.शिवानंद बिरादर, प्रशासकीय अधिकारी प्रविण कोल्हे, कम्युनिटी नर्सिंग हेल्थ विभागप्रमुख प्रा.जैसिंथ दाया यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमासाठी प्रा.निर्भय मोहोड, प्रा.रेबेका लोंढे, प्रा.प्रिया जाधव, प्रा.स्वाती गाडेगोने, प्रा.रितेश पडघन, प्रा.स्वरुपा कामटी, प्रा.आश्लेषा मून, प्रा.भूमिका जंजाळ यांचे सहकार्य लाभले.