जळगाव । अचानक अस्वस्थ झालेल्या रूग्णाला किंवा व्यक्ती जेव्हा मृत्यूच्या दारापर्यंत पोहोचते अशा वेळी सीपीआर ही पध्दत मोठी भूमिका बजावते. सीपीआर म्हणजे कार्डीओ पल्मनरी रिससिटेशन हे तंत्र जीवन आणि मृत्यूमधील सुरक्षित भिंत असल्याचे प्रतिपादन माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी केले. दरम्यान प्रत्येक व्यक्तीने या तंत्राची माहिती घेतल्यास वेळप्रसंगी अनेक जीव वाचविणे सहज शक्य होतील असेही ते म्हणाले.
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील मानसिक विकार विभाग आणि भूलशास्त्र विभागातर्फे सीपीआर तंत्राविषयीची जनजागृती करण्यासाठी डॉ. केतकी पाटील सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रय्या कांते, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, मानसिक विकार विभागाचे डॉ. विलास चव्हाण, भूलशास्त्र विभागाचे डॉ. देवेंद्र चौधरी, डॉ. कुटूंबे, डॉ. सी.डी. सारंग, आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात डॉ. देवेंद्र चौधरी यांनी सीपीआर तंत्राचे प्रात्याक्षिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना आणि कर्मचार्यांना करून दाखविले. यावेळी डॉ. उल्हास पाटील यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, अनेकदा हृदयविकाराचा झटका आल्यावर व्यक्ती अस्वस्थ होतो. अशा वेळी प्रसंगावधान राखून सीपीआर तंत्राचा अवलंब केल्यास त्या व्यक्तीचा जीव सहजपणे वाचविता येतो. त्यासाठी प्रत्येकाने ह्या सीपीआर तंत्राची माहिती जाणून घ्यावी असे आवाहन डॉ. उल्हास पाटील यांनी केले.