जळगाव : येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अॅनाटॉमी विभागातर्फे आयोजित मानवी शरीरातील विविध अवयव आणि त्यांची कार्ये याविषयक माहितीपर प्रदर्शनीचे गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी सीबीएसई स्कूल, डॉ. उल्हास पाटील सीबीएसई इंग्लिश स्कूल, भुसावळ आणि सावदामधील इयत्ता नववी व दहावीतील विद्यार्थ्यांना मोठे कुतुहल असल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांनी मानवी शरीरातील विविध अवयवांची माहिती जाणून घेतली.
गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित मोरया – २०२३ अंतर्गत अॅनाटॉमी विभागातर्फे एक दिवसीय मानवी अवयवांचे प्रदर्शन या शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष माजी खा.डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी अॅनाटॉमी विभागाच्या प्रमुख डॉ. शुभांगी वाघ-घुले, डॉ. जमीर खान, डॉ. पूनम, डॉ. रघुराज यादव हे उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. उल्हास पाटील यांनी गोदावरी स्कुल जळगाव, भुसावळ आणि सावदा सीबीएसई स्कूलच्या इयत्ता नववी व दहावीतील विद्यार्थ्यांना प्रदर्शनाबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन अत्यंत उपयुक्त असून त्याची माहिती जाणून घेण्याचे आवाहन केले. या प्रदर्शनीला डीएम कार्डीओलॉजीस्ट डॉ. वैभव पाटील यांच्यासह अधिष्ठाता डॉ. एन.एस. आर्विकर, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड यांनी भेट देऊन पाहणी केली.
विद्यार्थ्यांनी जाणून घेतली मानवी अवयवांची रचना
अॅनाटॉमी विभागातर्फे आयोजित मानवी अवयवांच्या प्रदर्शनीत विद्यार्थ्यांना शरीरातील विविध अवयव दाखविण्यात आले. तसेच हे अवयव शरीरात काय कार्य करतात याची माहिती देखिल वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी माहिती दिली. स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देखिल आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. या प्रदर्शनीच्या आयोजनासाठी डॉ. प्रत्यंशा कुराडे, डॉ. स्वराली जामकर, डॉ. संस्कृती भिरूड, डॉ. सृष्टी भिरूड, डॉ. श्रृती बियाणी, डॉ. प्राजक्ता जगताप, डॉ. अनुप जाधव, डॉ. सुमित राठोड, डॉ. मयुर जाधव, डॉ. संकेत गायकवाड यांनी सहकार्य केले.
गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये चांद्रयान-३ची आरास
गोदावरी सीबीएसई स्कुलमध्ये काल श्री गणेशाची स्थापना विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आली. गोदावरी स्कुलने चांद्रयान ३ ची आरास केली आहे. ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन झाले. दुपारी ४ वाजता स्कूलच्या प्राचार्य सौ .नीलिमा चौधरी आणि विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विधिवत गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली. विद्यार्थीनींनी यावर्षी पर्यावरण पूरक वस्तूंचा उपयोग करून उत्कृष्ट असे चांद्रयान -३ मोहीम साकारण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.