महामार्गावर एड्सबाबत जनजागृती; एड्स दिनानिमीत्त उपक्रम
जळगाव : जागतिक एड्स दिनानिमीत्त डिपार्टमेंट ऑफ फन्डामेंटल ऑफ नर्सिंग व रोटरॅक्ट विंग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय महामार्गावर एड्स या संसर्गजन्य आजाराबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी ट्रकचालकांना मोफत निरोध वाटप करण्यात येऊन एड्स या आजाराची माहिती देण्यात आली. सामाजिक भान जपणार्या या उपक्रमाचे सामाजिकस्तरातून कौतुक होत आहे.
जागतिक एड्स दिनानिमीत्त जिल्हाभरात विविध जनजागृतीपर कार्यक्रम घेतले जात आहे. समाजाच्या स्वास्थासाठी गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाने नेहमीच आपल्या उपक्रमांच्या माध्यमातून योगदान दिले आहे. जळगाव जिल्ह्यात एप्रिल २०२३ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत १ लाख २३ हजार ८६९ जणांची तपासणी झाली असून त्यापैकी १८४ व्यक्ती एचआयव्हीने संक्रमीत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान कामाच्या निमित्ताने दिवसेंदिवस बाहेर राहणार्या ट्रकचालकांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक असल्याचे एका अहवालाच्या माध्यमातून समोर आले होते. हीच बाब लक्षात घेता डिपार्टमेंट ऑफ फन्डामेंटल ऑफ नर्सिंग व रोटरॅक्ट विंग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय महामार्गावरील जळगाव खुर्द टोलनाका परिसरात जनजागृतीपर उपक्रम घेण्यात आला.
या उपक्रमांतर्गत विभागप्रमुख प्रा. पियुष वाघ, रोटरॅक्ट समन्वयक प्रा. प्रशिक चव्हाण, प्रा. अभिजीत राठोड, प्रा. अक्षय देसले यांनी टोलनाक्यावर काम करणारे कामगार आणि ट्रकचालक यांना एड्स या संक्रमित आजाराविषयीची संपूर्ण माहिती आणि सुरक्षापर मार्गदर्शनही केले. तसेच याप्रसंगी ट्रकचालकांना ५०० मोफत निरोधचे वितरणही करण्यात आले. कार्यक्रमाचे औचित्य साधून डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील एआरटी सेंटरला भेट देण्यात आली. याठिकाणी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत व एआरटी सेंटरची टीमसह रूग्णांनाही या आजाराविषयी मार्गदर्शन करण्यात आले.