जळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाला ३५० वर्ष होत आहेत . या निमित्ताने गोदावरी फाउंडेशन च्या संचालिका डॉ. केतकीताई पाटील यांच्या संकल्पनेतून रवींद्र पाटील यांच्या अभ्यासातून आणि रत्नाकर पाटील यांच्या शब्दांकनातून हिंदवी स्वराज्य दिनदर्शिका २०२४ निर्माण करण्यात आली असून महाराजांचे तत्व आणि विचार आजच्या तरूण पिढीसाठी प्रेरक ठरत आहे.
हिंदवी स्वराज्य दिनदर्शिका २०२४ च्या प्रत्येक महिन्याच्या पानावर महाराजांच्या गुंणाची,तत्वांची आणि कौशल्याची माहिती दिली आहे. त्यांनी दिलेली स्वराज्याची तत्वे आजच्या युगात कशी महत्वाची आहे याचाही ठसा त्यावर आहे. त्यातून प्रेरणा मिळून उत्साह व ऊर्जा मिळते. ज्यांनी ज्यांनी या दिनदर्शिकेची पाने वाचली त्यानां नव ऊर्जा प्राप्त होत असल्याचे अनेक युवक युवतींनी डॉ. केतकीताई यांना दुरध्वनीवरून तसेच प्रत्यक्ष भेटून मत व्यक्त केले आहे.
तसेच प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी हि दिनदर्शिका ज्ञानवर्धक असून ऊर्जेची शिदोरीच असल्याचे मत अनेक शिक्षकांनी व्यक्त केले आहे. इतिहासाची आवड असलेल्या आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या युवकांसाठी प्रेरणेचा स्रोत आहे. प्रत्येक दिनांकाला महाराजांच्या कालखंडात ज्या महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत त्याची नोंद त्या सालासह आहे. अशी माहिती शाळा महाविद्यालयात झालेल्या वाटपातून युवकांपर्यंत पोहचवली जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहे. त्यांचा इतिहास आणि त्यांनी समाजाला दिलेल्या तत्वांना अखंड भारताची भावी पिढी व आधारस्तंभ असलेल्या आजच्या युवा पिढीपर्यंत पोहचविण्याचा संकल्प होता. शिव राज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्षानिमिताने हिंदवी स्वराज्य दिनदर्शिकेच्या माध्यमातून हा संकल्प पूर्णत्वास आणण्याचा प्रयत्न केला – डॉ. केतकी पाटील