ट्रायजेमिनल न्युराल्जिया आजारावरील शस्त्रक्रियेने ४१ वर्षीय महिलेचा पुर्नजन्म

0
62

न्युरोसर्जन डॉ. अनंत चोपडे यांनी केली दुर्मिळ अतिजोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी

जळगाव : ट्रायजेमिनल न्युराल्जिया म्हणजे चेहर्‍यावर अचानक आणि तीव्र वेदना जाणवणे, जे काही सेकंदांपासून काही मिनिटांपर्यंत टिकू शकते. हा विकार चेहर्‍याच्या एका बाजूला किंवा दोन्ही बाजूंना होऊ शकतो. या अशाच दुर्मिळ आजाराच्या ४१ वर्षीय महिला रूग्णावर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील प्रख्यात न्युरोसर्जन डॉ. अनंत चोपडे यांनी अनुभवाच्या जोरावर ही अतिजोखमीची मायक्रोव्हॅस्कुलर डीकंप्रेशनची शस्त्रक्रिया यशस्वी केली. या शस्त्रक्रियेमुळे सदर महिला ही ट्रायजेमिनल न्युराल्जिया या आजारातुन पुर्णत: बरी झाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बर्‍हाणपूर येथील सुलतानाबी शेख ह्या महिलेच्या चेहर्‍याच्या एका बाजूस प्रचंड वेदना होत होत्या. पाणी पितांना, जेवतांना देखिल त्यांना ह्या वेदना होत होत्या. ह्या वेदना इतक्या असह्य असतात की, अशा आजारात रूग्णाच्या मनात वारंवार आत्महत्येचा विचार येतो. त्यामुळे प्रचलित भाषेत याआजाराला सुसाईडल डिसीज असेही म्हटले जाते. या आजारात रक्तवाहिनीचे ठोके हे संवेदना जागृत करणार्‍या नसेला बसू लागल्यानंतर प्रचंड वेदना होतात. बर्‍हाणपूर येथील सुलताना बी शेख यांनी दाढीचे दुखणे असेल म्हणून स्थानिक ठिकाणी दाढ काढल्या. मात्र तरी देखिल त्यांचे दुखणे वाढतच होते. त्यामुळे त्यांनी उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील रूग्णालय गाठले. याठिकाणी प्रख्यात न्युरोसर्जन डॉ. अनंत चोपडे यांनी रूग्णाने सांगितलेल्या वर्णनानुसारच आजाराचे निदान केले. त्यानंतर सुलताना बी शेख यांची एमआरआय तपासणी करून रक्तवाहिनी आणि संवेदना जागृत करणार्‍या नसेची परिस्थिती लक्षात घेत डॉ. अनंत चोपडे यांनी मायक्रोव्हॅस्कुलर डीकंप्रेशन ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

ह्या शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च लागतो. मात्र डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात उपलब्ध असलेल्या पंतप्रधान आयुषमान योजनेचा लाभ सदर महिलेला मिळवून देण्यात आला असून संपूर्ण शस्त्रक्रिया ही मोफत झाली आहे. मायक्रोस्कोपीकद्वारे झाली शस्त्रक्रिया सुलताना बी शेख या महिला रूग्णावर मायक्रोव्हॅस्कुलर डीकंप्रेशनची शस्त्रक्रिया करण्यात आली. या तंत्रानुसार मेंदूला बारीक छिद्रे पाडून चिकटलेली रक्तवाहिनीची नस आणि संवेदना जागृत करणारी नस ही वेगळी करण्यात आली. अतिजोखमीची असलेली ही शस्त्रक्रिया कौशल्य पणाला लावत आणि अनुभवाच्या जोरावर न्युरोसर्जन डॉ. अनंत चोपडे यांनी यशस्वी केली. दुसर्‍या दिवशी महिला रूग्णाच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होऊन रूग्ण या आजारापासून पुर्णत: बरी झाली आहे. या शस्त्रक्रियेसाठी डॉ. गजानन गवई आणि टीमचे सहकाय लाभले.

ट्रायजेमिनल न्युराल्जिया हा अत्यंत दुर्मिळ आजार आणि तितकाच तो गंभीर स्वरूपाचा आहे. लक्षणे आणि वर्णनाद्वारे या आजाराचे निदान होते. तसेच हा आजार बॉलीवुडमधील एका प्रसिध्द अभिनेत्यालाही झाला होता. पुर्वीच्या काळी शस्त्रक्रिया होत नसल्याने अनेक रूग्णांनी वेदना असह्य झाल्याने आत्महत्या देखिल केल्या आहेत. त्यामुळेच याला सुसाईडल डिसीज असेही म्हटले जाते. या आजारासाठी आवश्यक असलेली ही शस्त्रक्रिया ही अतिजोखमीची असते. शस्त्रक्रियेवेळी थोडे जरा दुर्लक्ष झाले तरी रूग्ण दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा शस्त्रक्रियांसाठी अनुभव हा खूप महत्वाची भूमिका निभावतो. डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात ट्रायजेमिनल न्युराल्जिया या आजाराची ही दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे समाधान आहे.

– डॉ. अनंत चोपडे, न्युरोसर्जन, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय, जळगाव

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here