ढोल, ताशा,लेझीमच्या गजरात गोदावरी स्कूलमध्ये गणेशाची स्थापना

जळगाव :
गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव येथे गणेश चतुर्थीचा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. ढोल, ताशा आणि लेझीमच्या गजरात विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषेत बाप्पाचे जल्लोषात स्वागत केले.
शाळेच्या प्रांगणात पारंपरिक पद्धतीने मंत्रोच्चार व धार्मिक विधी करून गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, फाउंडेशनच्या सदस्या डॉ. केतकी पाटील, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, प्राचार्य सौ. निलीमा चौधरी यांच्यासह शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मूर्तीस्थापनेनंतर सर्वांनी एकत्र येऊन आरती केली व भगवान गणेशाला फुलांचा व नैवेद्याचा मान अर्पण केला. विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवाचे महत्त्व सांगणारे सांस्कृतिक कार्यक्रम, गाणी व नृत्य सादर करून वातावरण अधिक भक्तिमय केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. शाळेत झालेल्या या गणेशमूर्तीच्या स्थापनेमुळे वातावरणात श्रद्धा, ऐक्य आणि आनंदाची भावना दुमदुमली.
