डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात गणपती आगमन व स्थापना

जळगाव, २८ ऑगस्ट २०२५ – डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. २८ ऑगस्ट रोजी सकाळी ढोल-ताशांच्या गजरात, लेझीमच्या तालावर आणि “गणपती बाप्पा मोरया” च्या गजरात महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी यांनी बाप्पाचे उत्साहात स्वागत केले. संपूर्ण परिसरात रंगीबेरंगी सजावट, फुलांची आरास आणि दिव्यांच्या प्रकाशामुळे पावन व आनंददायी वातावरण निर्माण झाले.
महाविद्यालयीन कुटुंबाच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली. भजने, टाळ-मृदंगाचा नाद आणि गजरामुळे परिसर भक्तिमय झाला.
मंत्रोच्चार व धार्मिक विधीमध्ये गणपती स्थापना ही विधीपूर्वक प्राचार्य डॉ. जयवंत नागुळकर व प्रशासन विभागातील श्री. राहुल गिरी यांच्या हस्ते करण्यात आली. स्थापना सोहळ्यानंतर प्रथम आरती करण्यात आली आणि सर्वांनी गणपती बाप्पाकडे यश, समृद्धी व ज्ञानासाठी प्रार्थना केली.
गणेशोत्सवाचे औचित्य साधून पुढील काही दिवस दररोज आरत्या, सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा व भक्तिगायन आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांमुळे विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्यात एकात्मता, भक्तीभाव आणि स्नेह वृद्धिंगत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

