आनंदाची कस्तुरी आपल्याचजवळ…सुगंध भरुन घ्या…
दारावरची बेल वाजली तसे हातातलं काम सोडून राधाने दरवाजा उघडला.
ये निशा, अगं किती उशीर… केव्हाची वाट पाहतीये मी…
ताई, नुसती वाट पहा तुम्ही, माणसाकडं काही पाहू नका…. निशा म्हणाली
अगं…कोणाकडे नाही पाहिलं मी… राधाने हसून पण काही आठवण्याचा प्रयत्न करत तिला विचारलं.
अहो…हे पहा गोल फिरुन निशाने राधाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
आणि अचानक राधाच्या लक्षात आलं की हा तर आपला जुना ड्रेस आहे…
वाह!! छानच दिसतो गं तुला…आणि सगळं मॅचिंग घातलंयस की…माझाच ड्रेस पण मीच ओळखला नाही बघ… राधा आश्चर्यचकित होऊन पाहू लागली.
मग…सगळं कसं भारी वाटतंय की नाही निशा म्हणाली
काही दिवसांपूर्वी राधाने बरेच दिवस वापरलेला ड्रेस फेकून देण्याऐवजी निशाला घालतेस का म्हणून विचारले होते आणि निशा तो ड्रेस घेऊन गेली होती. राधा तर तो प्रसंग विसरुनही गेली होती. पण आज अल्टर करुन निशाने तो घातला होता.
राधा विचार करु लागली, खरंच आपण किती छोट्या गोष्टींमधला आनंद घेणे विसरतो ना… हा ड्रेस अशा सर्व मॅचिंग वस्तू वापरुन तिने कधीही घातला नव्हता. पण आज निशाने तो किती सुंदर पध्दतीने घातला आणि त्या जुन्या कपड्यातही मोठा आनंद घेतला. तेवढ्यात राधाच्या मैत्रिणीचा फोन आला, विचाराच्या तंद्रितच तिने फोन उचलला आणि ती घडलेला प्रसंग मैत्रिणीला सांगू लागली
कामाच्या व्यापात आपण किती छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला विसरतो. नाही का
खरंय गं…लहानपणी आपण किती छोट्या गोष्टीत आनंद शोधयचो नाही का?
शाळेत आपल्याला बॅगेतील रंगीत खडू, डब्यातील खाऊ, बाईंनी डोक्यात माळलेले सुंदर फुल….अशी किती छोट्या गोष्टींतून आनंद मिळायचा, आणि आता वस्तूंचा नुसता बाजार आहे, मोबाईलपासून रस्त्यापर्यंत दुकानंच दुकानं पण कितीही खरेदी केली तरी समाधान नाही. मैत्रीण समोरुन बोलत होती.
हो ना…लहानपणी दिवाळीला एकच फ्रॉक मिळायचा. पण त्याचे काय अप्रुप असायचे नाही राधाने मैत्रीणीच्या बोलण्याला जोड दिली.
तिने एका मानसोपचार तज्ञांनी लिहीलेली पोस्ट राधाला शेअर केली.
पोस्ट अशी होती… जीवनातील सकारात्मक बाबींकडे लक्ष केंद्रित करा आणि नकारात्मक गोष्टींवर जास्त विचार करू नका.
मन आनंदी ठेवण्यासाठी काय उपाय करावेत?
आपल्या आजुबाजूला असणार्या सकारात्मक व्यक्तींच्या संपर्कात राहा. आपल्या जीवनात असलेल्या चांगल्या गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करा. यामुळे आपल्याला आनंदी आणि समाधानी राहता येईल.
स्वतःला आणि इतरांना क्षमा करा. भूतकाळातील चुकांबद्दल क्षमा करण्याचा प्रयत्न करा. हे आपल्याला वर्तमानात राहण्यास आणि आनंदी राहण्यास मदत करेल.
स्वतःसाठी वेळ काढा. आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी वेळ काढा. हे आपल्याला आनंददायी अनुभव देईल आणि आपल्या मनाला ताजेतवाने करेल.
नियमित व्यायाम करा. व्यायाम हा आनंदी राहण्याचा एक उत्तम मार्ग आहे. तो आपल्या शरीराला आणि मनाला तणावमुक्त करण्यास मदत करतो.
योग्य आहार घ्या. निरोगी आहार आपल्याला ऊर्जावान आणि आपल्या भावना आनंदी ठेवण्यास मदत करतो.
सकारात्मक लोकांशी संवाद साधा. सकारात्मक लोक आपल्याला आनंदी आणि प्रेरित राहण्यास मदत करतात.
स्वतःला आव्हाने द्या. नवीन गोष्टी शिकत राहा. यामुळे आपल्याला आनंददायी आणि समाधानी राहण्यास मदत होईल.
या व्यतिरिक्त, काही लोकांना ध्यान, योग किंवा आध्यात्मिक साधनांनीदेखील आनंद मिळतो. आपल्यासाठी काय कार्य करते हे शोधण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.
आयुष्य अतिशय सुंदर आहे. आपल्या आयुष्याचे उद्दिष्ट लक्षात घ्या.
प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन करा. नवीन गोष्टींचा अनुभव घेणे आपल्याला जीवनात अधिक रस घेण्यास मदत करेल.
कधीकधी आपणाला दुःखी, निराश किंवा तणावग्रस्त वाटू शकते. माणूस म्हणून हे अगदी स्वाभाविक आहे. मात्र स्वत:ला समजावण्याची सवय लावा. आपल्या बुध्दीने प्रॅक्टीकल विचार करा. आपणच स्वत:चे चांगले मित्र व्हा. तरीही त्रास होतोय असे वाटले तर जवळच्या मित्र किंवा मैत्रीणीशी बोला. लक्षात घ्या शेअरिंग इज केअरिंग ! तिच्या किंवा त्याच्याकडे तुमच्या समस्येचे उत्तर नक्कीच असेल. देवावर श्रध्दा ठेवा. अध्यात्मिक मदत घ्या. इतिहास वाचा त्यातून तुम्हाला तुमच्या समस्येपेक्षा खडतर आव्हानांचा सामना कसा करायचा याची उदाहरणे सहज सापडतील.
कुटुंबातील सदस्य किंवा थेरपिस्ट आपल्याला या भावनांशी जुळवून घेण्यास आणि आनंदी राहण्यास मदत करू शकतो. गरज भासल्यास मदत नक्की मागा. इतरांनी तुमच्या बरोबर राहावे असे तुम्हाला वाटते तसेच तुम्हीही कोणासाठी तरी नक्की उभे राहायला विसरु नका.
- डॉ.केतकी पाटील, संचालिका, गोदावरी फाऊंडेशन